मुंबई - शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी द्यायची की सत्तेतूनच बाहेर पडायचे असा पेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला असून ३० सप्टेंबरच्या दसरा मेळाव्यात ते काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांपैकी नऊ जणांनी आज ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदारांनी सध्याच्या पाच पैकी चार कॅबिनेट मंत्र्यांना बदलण्याची जोरदार मागणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एक राज्यमंत्री सोडले तर मराठवाड्याला शिवसेनेने प्रतिनिधीत्व दिलेले नाही, याकडे या आमदारांनी लक्ष वेधले.
सरकारमधून बाहेर पडायचे की नाही याबाबतचा निर्णय आपण घ्या पण सरकारमध्ये राहायचे असेल तर मराठवाड्याला न्याय द्या, असे साकडे या आमदारांनी घातले. सरकारबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर सोडा. काही मंत्र्यांना बदलावे ही आमदारांची भावना आहे. त्या बाबत मी योग्यवेळी निर्णय घेईन, असे ठाकरे यांनी आमदारांना सांगितल्याची माहिती आहे. ठाकरे यांना भेटलेल्या आमदारांमध्ये सध्या पक्षात नाराज असलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून तीन दिवसांच्या विदेश दौºयावर रवाना झाले. गेल्या महिन्यात त्यांचा हा दौरा रद्द झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे नेते सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत जाणार होते. मात्र, आज मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात केवळ अधिकाºयांचा समावेश होता.