नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल 'सामना'च्या आडून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?', असा प्रश्न काल फडणवीसांनी विधानसभेत विचारला होता, त्याला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दिलेल्या शब्दाचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, मी त्या थराला गेलो आणि करून दाखवलं. भाजपाची पालखी कायम वाहणार नाही, हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता, याचीसुद्धा आठवण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली आहे.
आम्ही दिलेलं वचन पाळतो, यापुढेही पाळणार आहोत. बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सुरू असलेले संसार भाजपाने मोडले, लालू आणि नितीश यांची युती तुम्हीच तोडलीत. राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. तर देशाची आर्थिक स्थिती कोमामध्ये आहे. मेक इन इंडियात किती करार झाले? गुंतवणूक आली पण पुढे काय झालं?, इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण?, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाने सभागृहात आज देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत जाहिर करण्याची मागणी केली होती. सभागृहात काही वेळ चाललेल्या आरोप- प्रत्यारोपनंतर भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.