मुंबई - सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील हालचालींना वेग आला आहे. या सरकारचे डेथ वॉरंट जारी झालंय असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. आता ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांना गळ घालण्यास सुरुवात केल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
या चिमण्यांनो परत फिरा रे अशी साद एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी सोडून गेलेल्यांना केली होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा येताना दिसतोय. शिंदे गटातील नाराज आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची बातमी ABP माझाने दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन कुठलेही पद आणि प्रतिष्ठा मिळाली नाही. त्याचसोबत ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात जाहीर भाष्य कुठेही केले नाही अशा आमदारांना साद घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
विशेष म्हणजे या आमदारांची एक यादी बनवली असून त्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी संपर्क केल्याचे कळतेय. महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच चर्चा आणि वावड्या उठताना दिसत आहेत कारण २०१९ च्या निवडणुकीनंतर कोण काय करेल आणि कुणाकडे जाईल हे सांगता येत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर यातील बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी आशा होती. ज्यांना कुठलीही पदे मिळाली नाही त्यांची नाराजी सुरुवातीला समोर येत होती. मात्र ही नाराजी रोखण्यास मुख्यमंत्री शिंदेंना यश आले होते.
मात्र आता जे आमदार नाराज आहेत त्याचसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे यामुळे आपण पुन्हा निवडून येऊ शकतो की नाही अशा लोकांची संपर्क साधण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालाय. एका कॅबिनेट मंत्र्यालाही ठाकरे गटाकडून मोठे पद देण्याची ऑफर करण्यात आले. त्याबाबत संबंधित मंत्र्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावरही ही चर्चा टाकली असल्याचं बातमीत दावा केला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटातील कुणीही आमदार ठाकरे गटात परतले तर राज्यात वातावरणनिर्मिती करता येईल असा प्रयत्न ठाकरेंचा आहे. त्यानुसार सध्या नाराज आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या महाराष्ट्रातील सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार आहे. त्यामुळे चर्चा आणि वावड्यांना उधाण आले आहे.