मुंबई - प्रसंगी राज्य गहाण ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधू, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखामधून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. "पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायलाच हवीत. त्यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू, असे मुख्यमंत्री जाहीर सभांतून बोलतात, हे बरे नाही. मुळात राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे."राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहे. त्यांचे राज्य तुम्ही गहाण कसे टाकणार? मुख्यमंत्री येतात व जातात. सरकारे बदलत असतात, पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कुणी करीत असेल तर ते योग्य नाही." असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच- पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायलाच हवीत- पण त्यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू, असे मुख्यमंत्री जाहीर सभांतून बोलतात, हे बरे नाही- डॉ. आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती- सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी ज्याप्रकारे घोषणांचा पाऊस पडतो आहे तो थक्क करणारा आहे- पैशांअभावी ही स्मारके रखडणार असतील तर ते राज्याला शोभादायक नाही-सरकारी जाहिरातींवर हजारो कोटी फेकले जात आहेत. तेथे कात्री लावा- सरदार पटेल यांच्या या पुतळय़ासाठी तेथील भाजप सरकारने गुजरात राज्य गहाण ठेवलेले नाही- अशा ‘अतिउत्साही’ वक्तव्यांमुळे सरकारची, राज्याची ‘इभ्रत गहाण’ ठेवण्याची वेळ येऊ शकते, म्हणून जीभ घसरू देऊ नका
राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:24 AM