मुंबई - पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर इम्रान खानने घेतलेल्या काटकसरीच्या निर्णयाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखातून खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून इम्रान खान यांनी काम करायचे ठरवले आहे. मोदी यांच्याप्रमाणेच इम्रान खान हे स्वतःला प्रधान सेवक मानू लागले आहेत. देशाला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले आहे. मात्र पाक सरकारचा सगळय़ात जास्त खर्च हा ‘दहशतवादी फॅक्टऱ्या’ व लष्करावर होतो. हे सर्व नसते उद्योग थांबवले तरी पाकिस्तानची भरभराट सुरू होईल, असा सल्ला सामनातील अग्रलेखातून देण्यात आला आहे. सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे : - मोदी यांच्याप्रमाणेच इम्रान मियां हे स्वतःला प्रधान सेवक मानू लागले आहेत- पाकिस्तान दिवाळखोर आणि भिकारी बनले आहे ही वस्तुस्थिती आहे- देशाला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले व काटकसरीचे प्रयोग त्यांनी सुरू केले. खान यांचे हे प्रयोग म्हणजे दात कोरून पैसे जमवण्याचे प्रकार आहेत- भारतात प्रधान सेवक मोदी यांनी मंत्र्यांच्या गाडय़ांवरील लाल दिवे काढले, पण त्यामुळे गाडय़ांचे ताफे व उधळपट्टय़ा कमी झालेल्या नाहीत- पाकिस्तानचे पंतप्रधान काटकसरीचा भारतीय मार्ग स्वीकारणार असतील तर त्यांचे काही खरे नाही. - इम्रान खान यांनीही निवडणुकीपूर्वी पाकिस्तानी जनतेला भव्य स्वप्ने विकली, पण निवडणूक भाषणात जी जुमलेबाजी केली ती प्रत्यक्ष अमलात आणणे कठीण आहे हे शपथ घेताच त्यांच्या लक्षात आले.- पाकिस्तानातील मुख्य उद्योग ‘दहशतवादी फॅक्टऱ्या’ हाच आहे. बाकी तिकडे कसले उत्पादन होत असेल असे वाटत नाही. पाक सरकारचा सगळय़ात जास्त खर्च हा ‘दहशतवादी फॅक्टऱ्या’ व लष्करावर होतो. - कश्मीर तसेच हिंदुस्थानातील घुसखोर वाढविण्यावर त्यांचे पैसे खर्च होतात व हा ‘सण’देखील ते कर्ज काढून करतात. हे सर्व नसते उद्योग थांबवले तरी पाकिस्तानची भरभराट सुरू होईल. - इम्रान खान यांनी दहशतवादी ‘उद्योगां’वर एक शब्दही काढलेला नाही. - प्रधान सेवकाचा मुखवटा लावून इम्रान खान जे करू पाहात आहेत ते सर्व ढोंग आहे हे पाक जनतेला कळायला वेळ लागणार नाही- इम्रान यांनी हिंदुस्थानच्या विद्यमान राजकारणाचा अभ्यास करावा. नाही तर नवज्योत सिध्दूची शिकवणी लावावी
काटकसरीचा निर्णय म्हणजे इम्रान खानचे ढोंग, शिवसेना पक्षप्रमुखांची सामनातून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 7:59 AM