मुंबई - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक कलगीतुरा सुरूच आहे. शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे उत्तर देत उद्धव ठाकरेंना अर्धवटराव अशी उपमा दिली होती. आता त्याच अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी लस तयार केली नसती तर असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस असं बोलतील यावर विश्वास नव्हता. मोदींनीही असे विधान केले नसावे. मी हा व्हिडिओ दाखवला. तो मोर्फ केला असेल तर चौकशी करा. त्यावर त्यांनी मला अर्धवटराव म्हणाले, अर्धवटराव हे पात्र रामदास पाध्येंनी तयार केले. मला अर्धवटराव म्हणत असतील तर फडणवीस दिल्लीश्वरांची आवडाबाई आहे का? आता तेही दिसत नाही ते नावडाबाई झालेत. मोदींनी लस बनवली या वाक्याला अर्थ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. क्लीनचीट दिल्या तर त्याची चौकशी करूसत्ताधाऱ्यांवर कुठले आरोप केले जातायेत त्यावर चौकशी होतेय असं दिसत नाही. रोज क्लीनचीट मिळतेय. या सर्व क्लीनचीट आम्ही आमचे सरकार आल्यावर काढू. या क्लीनचीट कुणी दिल्या आणि कशा दिल्या याची सविस्तर चौकशी करू. बीएमसीतील भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल तर काढा आम्ही घाबरत नाही. सरकारी यंत्रणांचा दबाव आहेच, गद्दारांकडे स्वत:ची ताकद नाही, ताकदही चोरावी लागतेय. ताकदही पोलिसांची वापरावी लागते. पोलिसांशिवाय पान हलत नाही असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
आम्ही केंद्रावर दोषारोप केले नाहीत मोदींनी लस तयार केली नसती तर कटोरा घेऊन उभे राहावे लागले असते असं फडणवीस म्हणतात, तुम्ही लोकांना मुर्ख समजता का? १७ कोटी लस दिल्या सांगता, मी मुख्यमंत्री असताना लस विकत घेण्याची तयारीही दाखवली होती. आम्ही पैसे देतो आम्हाला पाहिजे तेवढ्या लस द्या पण दिल्या नाहीत. तरीही आम्ही केंद्रावर दोषारोप केला नाही. केंद्राने पीपीई किट कुठून आणल्या? त्याची खरेदी कशी केली. त्यात घोटाळा झाला का? N95 मास्क कुठून आणलेत, टेंडर काढले होते का असे प्रश्न आम्ही विचारत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.