Lok Sabha Election 2024 Thackeray Group Manifesto News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकामागून एक जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शपथपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ठाकरे गटाने या जाहीरनाम्याला वचननामा असे नाव दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार महराष्ट्रात येईल. महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देऊ, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली. आपण ऐकले असेल की, भूताची भीती वाटल्यानंतर, रामनामाचा जप केला जातो आणि त्यानंतर भूते पळतात, असे म्हणायचे. खरे-खोटे मला माहिती नाही. भाजपाची अवस्था तशी विचित्र झाली आहे. भाजपाला आता पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने ते आता रामराम म्हणायला लागले आहेत. त्यांचा हा नेहमीचाच उद्योग आहे, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी लगावला.
महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देऊ
काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीरनामा केलाय. सुरुवातीलाच सांगितले होते की, आवश्यक वाटले तरच आम्ही आमचा वचननामा प्रसिद्ध करू. त्यानुसार, शिवसेनेच्या वतीने वचननामा प्रसिद्ध करत आहोत. मी शिवसेनेच्यावतीने जनतेला विनंती करतो की, आशीर्वाद असूद्या, असे आवाहन करत, महाराष्ट्राचे वैभव मविआ काळात वाढत होते. त्यावेळी केंद्र सरकार मविआ सरकारला मदत करत नव्हते. आता इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.
महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे
आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाहीत. सगळ्या राज्यांना मानसन्मान देऊ. सगळ्या राज्यांना जे आवश्यक असेल ते देऊ. पण वित्तीय केंद्र हे नव्याने महाराष्ट्रात उभारु, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ. महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले जात आहेत, व्यापार पळवले, क्रिकेटचा सामना पळवला, फिल्मफेअर कार्यक्रम पळवले, सर्वच गोष्टी पळवल्या जात आहेत. महाराष्ट्राचे वैभव लुटले जात आहे. ही लूट आम्ही इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर थांबवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाच्या वचननाम्यातील ठळक मुद्दे
- प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आणू. अनेक जिल्ह्यात औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले ते होणार नाही अशी यंत्रणा उभारू.
- शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो त्याचे निकष कंपन्यांनी ठरवलेत. ते निकष बदलले जातील.
- ज्याला मार्केट आहे तेच पीक घ्यायचं. तसे शेतकऱ्याला मार्गदर्शन करून ते पीक घेण्यास सांगायचं जेणेकरुन शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळेल. त्यामुळे श्तकरी कर्जबाजारी होणार नाही.
- उद्योगाला आम्ही चांगले दिवस आणू. पर्यावरणपूरक प्रकल्प आणू, बारसू, नाणारसारखे पर्यावरणाला हानी पोहचवणारे प्रकल्प हद्द पार करू.
- लोकप्रतिनिधींचे अधिकार आम्ही त्यांना देऊ. कर दहशतवाद हा मुद्दाही महत्वाचा आहे तो आम्ही थांबवू.
- ज्या धाडी आणि इतर गोष्टी सुरू आहेत त्या थांबवू. जीएसटी वरील त्रासदायक अटी आम्ही काढून टाकू.
- मराठी भाषेबद्दल केंद्राच्या मनात आकस असल्यानेच केंद्राने १० वर्षापासून मराठीला अभिजात दर्जा दिलेला नाही.
- भाजपाशासित केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीची दडपशाहीने अंमलबजावणी करून कर दहशतवाद सुरू केला. यात देशातील राज्य सरकारे, स्थानीय स्वराज्य संस्था आणि छोटे व्यापारी यांना जबरदस्त त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबविण्यासाठी अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत करून योग्य ती सुधारणा आम्ही करू.
- नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य व्हावे म्हणून जीएसटी महसुलातून स्थानीय स्वराज्य संस्थांना योग्य त्या प्रमाणात हिस्सा देण्याची तरतूद करू.
- देशाची हुकूमशाहीकडे आणि एकाधिकारशाहीकडे चाललेली वाटचाल रोखून घटनेनुसार अंमलात आलेली संघराज्य पद्धती अधिक बळकट करू.
- शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, जंतूनाशक औषधे, खते, औजारे इत्यादींवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकला जाईल.
- शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. शेतमालाला उचित हमीभाव देण्याचे धोरण शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून ठरविले जाईल. विकेल ते पिकेल या धरतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करणार. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची उत्तम दर्जाची पुरवठा साखळी व्यवस्था निर्माण करणार.
- मुंबईतून आयकर सीमाशुल्क व अन्य करांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत दरवर्षी काही लाख कोटी रूपये जमा होतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद करून घेऊ.
- इंडिया आघाडीचे सरकार महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र स्थापन करेल आणि राज्यातील तरूण-तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहील.
- ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ.
- आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपा सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. ओबीसी समाजही तणावग्रस्त आहे. महाराष्ट्रातील धनगर, कोळी तसेच भटके-विमुक्त्यांच्या मागण्याही प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढविण्यासाठी आम्ही आग्रही राहू.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच आर्थिक व अन्य मांगास घटकातील विद्याथ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत वाढविण्यासाठी आम्ही आग्रही राहू.
- सर्व नागरिकांना त्यांच्या आरोग्य रक्षणाचा मुलभूत अधिकार आहे हे मान्य करून सर्वांच्या आरोग जिलाची जबाबदारी सरकारची आहे या सूत्रानुसार आा अघि साल से गोवा दूर करून राज्यातील प्रत्येक सुल्ह्यिातील रुग्णालये आधुनिक उपकरणात सुसले व्यासेो प्रथिमिक आरोग्य केंद्रामध्येही आवश्यक उपलब्ध करून देऊ.
- महाराष्ट्रात उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी एक खिडकी योजना आणणार. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने नवीन शासकीय धोरण अस्तित्वात आणणार.
- राज्यात सर्व प्रकारचे उद्योग विकसित व्हावे यासाठी आग्रही राहणार. विनाशकारी प्रकल्प उदाहरणार्थ जैतापूर, बारसू, वाढवण यासारखे पर्यावरण आणि जनजीवनास घातक ठरणारे प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार करू आणि पुन्हा येऊ देणार नाही.
- केंद्र सरकारमधील सर्व नवीन नोकऱ्यांपैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव ठेवणार. गरिबांसाठी शहरी रोजगार हमी योजना राबवणार.
- विविध उपकर आणि अधिभार कमी करून किंवा रद्द करून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती कमी करणार आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र सरकारचे अनुदान दुप्पट करून देणार.देशातील राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता जपली जाईल.
- इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने महिलांसाठी 'महालक्ष्मी' योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी १ लाख रूपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. इंडिया आघाडी सरकारकडून या योजनेची त्वरीत व प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सदैव सतर्क राहतील. महिलांबद्दल जाहीरपणे अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- अशा अनेक गोष्टी ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.