मुंबई - एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांनासोबत घेत केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडून अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीनंतर या बंडाला सुरुवात झाली असतानाच उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्याशी संपर्क साधला होता, अशा आशयाच्या बातम्या आज समोर आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र आता स्वत: उद्धव ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही फोन लेका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांशी संपर्क साधल्याच्या बातम्या ह्या अफवा आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या कुठल्याही नेत्याला फोन केलेला नाही, असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उद्धव ठाकरे जे बोलायचं ते उघडपणे बोलतात, त्यामुळे कुठल्याही अफवा पसरवू नयेत, असं आवाहन उद्धव ठाकरे यांचे माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी केलं आहे.
उद्ध ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. फोनवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट एकनाथ शिंदेंना बाजुला करा आणि आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन केले. एकनाथ शिदेंची बारगेनिंग पॉवर का वाढवत आहात, थेट आमच्याशी बोला. आपण भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करू, असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोनकॉलद्वारे दिला होता. मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही थेट अमित शहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते, अशा आशयाचे वृ्त्त सकाळी सर्वच माध्यमांमधून प्रसारित झाले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची बातमी झळकली होती.