समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ राज्यातील पावसाळी अधिवेशनात ठराव मांडावा. त्यावर सर्व पक्षांची सहमती घेऊन तसा प्रस्ताव मोदी सरकारकडे द्यावा, अशी मागणी शिंदे गट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे या कायद्याला विरोध करत आहेत. हिंदूंना त्रास होणार म्हणून नाही तर गांधी कुटुंबाला त्रास होणार म्हणून ते या कायद्याला विरोध करत आहे. ते गैरसमज पसरवत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही चोरल्याचे ते म्हणत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असा आरोप शेवाळे यांनी केला. हुसेन दलवाईंनी आधी कायद्याचा मसुदा वाचावा यानंतर वक्तव्य करावे, असे शेवाळे म्हणाले.
गेली ७५ वर्षे या कायद्याची संसदेत चर्चा झाली नाही. आम्ही मोदींना या पावसाळी अधिवेशनात कायदा आणण्याची मागणी करत आहोत. त्यावर संसदेत चर्चा होईल. सर्वांना विनंती आहे की कोणी गैरसमज पसरवू नयेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भुमिकेचा स्वीकार करावा. भाजपाच्या साथीने शिवसेनेची सत्ता यावी हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, असे शेवाळे म्हणाले.