राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याबाबत रणनिती काय असेल यावर ठाकरे बैठक घेतील असे म्हटले जात आहे. यावर देसाई यांनी टोमण्यांतून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आवाज उठविणार आहेत. अशातच उद्धव ठाकरे येणार असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये देखील उत्साह दिसण्याची शक्यता आहे. मविआच्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे.
या परिसराला आनंद होईल उद्धव ठाकरे साहेबांचे आगमन होणार आहे. ही इमारत त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. ते माजी मुख्यमंत्री आहेत. विधान परिषदेचे सदस्य आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कामकाजात भाग घेणे, सूचना करणे, कुठे चुकतेय ते सांगणे, लक्ष ठेवणे हे जबाबदारीचे काम असते. पूर्ण आठवडा गेला, ते कुठे दिसले नाहीत. ते नेहमीप्रमाणे राजकीय टोमणे मारतायत की शेतकऱ्यांच्या हिताचे बोलतायत याची आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.