ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात उद्धव ठाकरे शिवसेना कशी सांभाळतील याविषयी अनेकांनी लेखणी झिजवली. मात्र बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घेऊन पक्षाचा विस्तार केला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची पाठ थोपटली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी उद्धव ठाकरेंचे जाहीर कौतुक केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. तर आर. आर. पाटील यांचे बलात्काराविषयीचे विधान निंदनीयच आहे. मात्र आबांनी माफी मागितल्याने हा विषय आणखी वाढवू नये असे शरद पवारांनी सांगितले. जागावाटपात सुरुवातीला नेहमीच जास्तीत जास्त जागा मागितल्या जातात. आम्ही १४४ मागितल्या होत्या. आम्ही १२५ ते १३० जागांची मागणी केली मात्र आघाडी तुटल्याने आम्हाला २८० जागा लढवाव्या लागल्या असे पवारांनी स्पष्ट केले. यंदा सर्व पक्ष स्वतंत्र लढवत असल्याने मतदार गोंधळला आहे हा दावा अमान्य असल्याचे सांगत मतदार राज्याच्या हिताचाच निर्णय घेतील अशे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास शिकवला जातो अशी टीकाही त्यांनी केली. आता सत्तेतील कोणतेही पद घेणार नाही असे सांगत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले.