शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच या फोटोसोबत त्यांनी जिंकून दाखवणारच असंही कॅप्शन दिलं आहे.