मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा लांबलेला विस्तारही झाला आहे. खातेवाटप अद्याप झाले नसले तरी नाराजीचा सूर शिवसेनेतून बाहेर येऊ लागला आहे. त्यातच पुत्र आदित्य ठाकरेंना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्याने टीका होऊ लागली आहे. या बाबतीत उद्धव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
एकाच मंत्रीमंडळात पिता-पुत्र ही घटना इतिहासात दुर्मिळ असली तरी देशात हे सहाव्यांदा घडले आहे. आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या मंत्रीमंडळात देखील त्यांचे पुत्र के.टी. रामराव यांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री उद्धव यांनी आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटमंत्रीपद दिले आहे. आजपर्यंत राज्यात अनेकदा काका-पुतणे, मामा-भाचे, वडिल-मुलगा असं चित्र याआधी पाहायला मिळाले आहे. मात्र पिता मुख्यमंत्री आणि पुत्र कॅबिनेटमंत्री अस पहिल्यांदाच घडत आहे.दरम्यान तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर यांचे पुत्रच नव्हे तर भाचे हरिश राव अर्थमंत्रीपदी विराजमान आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांचे पुत्र मंत्री होते. या व्यतिरिक्त तामिळनाडू, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये असं घडलेलं आहे.