ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे टर उडविली आहे. या चित्रातून त्यांनी उद्धव यांची संभावना "गजनी" अशी केली आहे. या व्यंगचित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे गजनी अशी उपमा देऊन नितेश राणेंनी सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. गजनी चित्रपटात अभिनेता अमीर खानने त्याच्या शरीरावर विविध शब्द आणि ओळी गोंदवून घेतल्या होत्या. या चित्रपटात त्याने उद्योगपती संजय सिंघानियाची भूमिका साकारली होती. खलनायकाने एकदा डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने स्मरणशक्ती गमावलेला सिंघानिया अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या शरीरावरच गोंदवून घेतो, अशी या चित्रपटाची कथा होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्याचे नितेश यांनी रेखाचित्राच्या माध्यमातून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आमचा मित्र पक्ष आहे, एनडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध, जीएसटीला विरोध, कर्जमाफीला विरोध, सत्तेत आहे आणि समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे आदी मुद्द्यांकडे राणे यांनी या व्यंगचित्रातून लक्ष वेधले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र सरकारचं समर्थन परत घेणार असल्याच्या पोकळ धमक्या देणा-या शिवसेनेच्या नावे रेकॉर्ड नोंदवला गेला पाहिजे, असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला चिठ्ठी लिहून नितेश राणेंनी कळवलं होतं.त्यावेळी नितेश राणे म्हणाले होते, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक रेकॉर्ड रजिस्टर करू इच्छितो, शिवसेनेनं ब-याचदा भाजपा सरकारचं समर्थन परत घेण्याच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे, असे नितेश राणेंनी पत्रामध्ये नमूद केले होते. नितेश राणे टीका करत म्हणाले की, शिवसेनेसाठी हा एक वेगळा रेकॉर्ड असेल.