लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छोटा रिचार्ज येऊन गेल्याचे समजते, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या भेटीवर मिश्कील टिप्पणी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शाह यांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन रविवारी मुंबईत होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांच्यासह सोळा राज्यांतील पक्षाचे खासदार, आमदार आणि अध्यक्ष उपस्थित होते.
केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे. हरयाणा आणि राजस्थानमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत. पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी काँग्रेस भारत जोडो यात्रेत मग्न आहे. लव्ह जिहादच्या मोर्चामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टीका ओवैसी यांनी केली.
लोकभावना विचारात न घेता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, असे नामकरण केले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कशी आघाडी करायची, याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ नाव बदलून हे शक्य होणार नाही, याची सरकारलाही जाण आहे. एकूणच जनतेच्या भावनेशी हा खेळ असून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील, असे खा. जलील यांनी स्पष्ट केले.
तीन पक्षांसोबत आघाडी करणारराज्यातील आगामी महा पालिकांसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत एमआयएम तीन पक्षांसोबत आघाडीचा ठराव अधिवेशनात करण्यात येणार आहे. हे पक्ष समविचारी असतील, मात्र ते कोणते पक्ष आहेत, याची माहिती देण्यात आली नाही.