Uddhav Thackeray Maharashtra Politics: महाराष्ट्रात गेल्या वर्षी जून महिन्यात मोठी बंडखोरी झाली. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन आधी गुजरात आणि मग गुवाहाटी गाठलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी संपर्क होत नसल्याची खंत बहुतांश आमदारांनी मांडली. काही दिवसांच्या अयशस्वी चर्चेनंतर, एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली. काही दिवसांपूर्वी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णयही निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे नवा पक्ष उभारणे आणि नव्याने कार्यकर्ते तयार करण्याचे मोठे आव्हान आहे. असे असताना, दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे परभणीचे खासदार बंडू जाधवांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता त्यांनीच आणखी एक मोठं विधान केलं आहे.
“एका सामान्य परिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार, मार्केट कमिटी, खासदार या सर्व पदांवर काम करण्याचं भाग्य मिळालं. हा जन्म काय, सात जन्म पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, एवढं दिलं आहे. त्यामुळे पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर खूप ठेंगणं वाटतात. त्यामुळे ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या रक्तात दोष आहे. कारण, ज्या पक्षाने आपल्याला वाढवलं, त्याच्याशी पाईक राहणं आमचं कर्तव्य आहे,” असं मोठं विधान त्यांनी केलं.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना दिला होता घरचा आहेर!
"जून महिन्यात राजकीय नाट्य घडलं. एकनाथ शिंदेंनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यांना बहुमताच्या जोरावर ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्याआधीचा अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची अडवल्याने यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चूल मांडली, तर काय बिघडलं? आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली. उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. त्यामुळेच ह्या चोराला संधी मिळाली," असे रोखठोक मत बंडू जाधवांनी मांडले होते.