मुंबई – राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधु एकत्र येणार अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे अनेक पोस्टर्स राज्याच्या विविध शहरांमध्ये झळकले होते. परंतु दोन्ही बाजूने यावर कुठलीही अधिकृत प्रतक्रिया आली नव्हती. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांचे मत मांडले होते. आता शिवसेनेचे पावसकर यांनीही ठाकरे बंधुंच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे.
शिवसेना नेते किरण पावसकर म्हणाले की, एकत्र येण्याबाबत दोन्ही नेतेच निर्णय घेतील. हा कौटुंबिक विषय आहे. राज ठाकरे हे सक्षम आहेत. त्यांना पूर्वानुभव आहे. कधी कोणाला टाळी द्यायची, टाळी द्यायची नाही. कारण अनेकदा टाळीसाठी हात पुढे आले आणि दुसरीकडे गेले. माझ्या मते यात उद्धव ठाकरेंचे आता काही नाही. टाळी द्यायची की नाही हे एकमेव राज ठाकरेच ठरवतील असंही त्यांनी म्हटलं.
तसेच काही जुन्या शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दोघांनी एकत्र यावे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी, मुंबई-महाराष्ट्रासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी भूमिका अनेकदा शिवसैनिकांनी मांडली आहे. पण काही लोकं फोन केला तर घेत नाही, बोलायचे पण पुढे काय करायचे नाही असं करून वेळ काढूपणा करायचा. दोघांनी एकत्र येऊया म्हणतील आणि उद्धव ठाकरे दुसऱ्याच कुणाशी युती करतील. त्यांच्याबाबतील कुणी काय सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबाबत सांगण्याची गरज नाही असा चिमटाही पावसकरांनी काढला.
दरम्यान, इंडिया आघाडीत आता उद्धव ठाकरे-संजय राऊत बसलेत. ते कधीही कुणाशी हातमिळवणी करतात. ज्यांच्याकडून फायदा असेल तिकडे उद्धव ठाकरे जातात. स्वत:च्या फायद्यासाठी ते तत्वे, बाळासाहेबांचे विचार हे सर्व मोडतोड करून कुणासोबतही जातील याची गॅरंटी आहे असाही शिवसेना नेते किरण पावसकर यांनी दावा केला आहे.