मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारनं भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत मात्र कपात केली आहे. याशिवाय भारतरत्न सचिन तेंडुलकर, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीदेखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरे सरकारनं देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला होता. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आधी वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांच्या सुरक्षेतील एस्कॉर्ट काढून घेण्यात आली आहे. आता त्यांच्यासोबत दोन हवालदार असतील. भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंची एस्कॉर्ट सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणेंची सुरक्षादेखील कमी करण्यात आली आहे. आधी त्यांना वाय प्लस सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे. यासोबतच माजी राज्यपाल राम नाईक यांची सुरक्षा झेड प्लसवरुन एक्स दर्जाची करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची सुरक्षा वाय प्लसवरुन झे़ड दर्जाची करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा वाय दर्जाची करण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एक्स दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
ठाकरे सरकारचा आणखी एक धक्का; घटवली 'या' भाजपा नेत्यांची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:38 PM