Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने जाता-जाता घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मागणीला मंजूरी दिली. कॅबिनेटमध्ये संभाजीनगर नावाला मंजुरी मिळताच शहरात शिवसैनिकांनी (Shiv Sena) जल्लोष केला. शहरातील विविध भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक व नागरिकांसह ढोलताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला. पण स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे नामकरण रुचलं नाही. तसेच एमआयएम नेत्यांनाही हे नामकरण पसंतीस पडलं नाही. याच मुद्द्यावरून AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या मावळत्या सरकारवर पुन्हा एकदा टीका केली.
औरंगाबादचे घाईघाईत नामकरण करण्याचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला, त्यावेळी त्या नामकरणामागे संभाजी महाराज यांच्याबाबतचे प्रेम नव्हते. स्वत:ची सत्तेची खुर्ची वाचवणे हे त्या निर्णयामागचे खरं कारण होतं. ठाकरे यांची सत्ता जात असताना कदाचित या नामकरणाने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचेल असा हा त्यांचा प्रयत्न होता. कोणत्याही जाती-धर्माचे लोक हे औरंगाबाद या नावाशी संबंध जोडत होते. कोणीही या शहराचे नाव बदलण्याची मागणी करत नव्हते. आतादेखील आम्ही आमच्या पद्धतीने लढा देऊ. आम्ही आंदोलनं करू, कोर्टाकडे दाद मागू आणि संसदेत देखील आवाज उठवू, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी विधान केले.
दरम्यान, या आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड झाले त्यावेळी ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांसमोर आले होते. त्यांनी शिंदे गटाला चर्चेला मुंबईत येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले होते. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणा मला खूपच भावला. आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण ऐकून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला. तुमच्या पक्षातील सर्व बंडखोरांना तुम्ही तुमच्या नम्रपणे चपराक लगावली आहेत", असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले होते.