मुंबई- संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दोशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र, आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले आहे. (Uddhav Thackeray govt needs a small pat in on the back for lowering the Coronavirus infection rate in Mumbai says Subramanian Swamy)
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ठाकरे यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमणाचा दर कमी केल्याबद्दल उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी. तसेच, मला विश्वास आहे, की आता रुग्णालयेही सज्ज झाली आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.
धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!
राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला ऑक्सिजनपासून ते अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात ८०२ मृत्यूची नोंद - राज्यात शनिवारी ६३ हजार २८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे.
राज्यात २४ तासांत ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.