'सोम्या-गोम्या' वरून रंगला सामना; संजय राऊतांनी घेतला अजित पवारांचा खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:59 AM2024-01-01T11:59:16+5:302024-01-01T12:00:07+5:30
इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आले नव्हते असं राऊतांनी म्हटलं आहे.
मुंबई - Sanjay Raut on Ajit Pawar ( Marathi News ) राज्यातील राजकीय आखाड्यात आता पुन्हा अजित पवार-संजय राऊत समोरासमोर आले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चा सांगता सभेत संजय राऊतांनीअजित पवारांवर टीका केली होती. अजितदादांची मिमिक्री करत राऊतांनी आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल.हवा बहुत तेज चल रही है, अजितराव टोपी उडी जाएगी असं विधान केले होते.
संजय राऊतांच्या टीकेवर पुण्यात पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला होता. त्यावर मी सोम्या गोम्यानं बोललेलं त्यावर उत्तर देत नाही असं सांगत एका वाक्यातच राऊतांची खिल्ली उडवली. त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्या उत्तरावर राऊतांनी पलटवार केला आहे. अजितदादांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे. जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. सोमे गोमे कोण हे २०२४ ला कळेल. हे मी वारंवार सांगतोय असं संजय राऊतांनी म्हटलं.
तसेच महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, राज्यातील उद्योग पळवले जाताना, रोजगार पळवले जातायेत. महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकारमधील हौसे, नवसे आणि गवसे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतके नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नसतील. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय. डोळ्यासमोर मुंबई तोडली जातेय. मुंबई-पुण्यातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना केवळ आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटतायेत. त्यांनी आमच्यावर बोलूच नये असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, टेस्ला, पाणबुडी तसेच त्याआधीचे प्रकल्प असतील असे अनेक प्रकल्प डोळ्यासमोर जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री डोळ्यावर कातडे आणि तोंडावर कुलुप लावून बसले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आले नव्हते. इतिहासात आणि भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार ओरबडून नेला जातोय. तुम्हाला गुजरात सोन्याने मढवायचा असेल तर मढवा, पण तुम्ही महाराष्ट्र कशाला लुटताय?. महाराष्ट्र लुटता यावा यासाठी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले गेले. शिवसेना फोडली, आमदार फोडले हे केवळ मुंबई, महाराष्ट्राची लूट करता यावी यासाठीच करण्यात आले आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं.