पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू झाली आहे. त्यात अनेकांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशावेळी पुण्यातील जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मागील २ निवडणुका मनसेकडून लढवणारे वसंत मोरे हे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. लोकसभेला त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना फारसं यश मिळालं नाही. आता वसंत मोरे विधानसभेच्या तयारीला लागलेत. मात्र ते ज्या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. तिथून सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय निवडणुकीची तयारी करत आहेत.
वसंत मोरे यांनी गेल्यावेळी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली. आता ते खडकवासला मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. याबाबत वसंत मोरे म्हणाले की, माझ्या मतदारसंघाची महापालिकेची रचना अशी आहे की मी पुण्याच्या शेवटच्या भागात राहतो. त्यामुळे त्या मतदारसंघात पुरंदर, खडकवासला आणि हडपसर या तिन्ही मतदारसंघाच्या सीमा माझ्या महापालिका वार्डात येतात. आता ४० टक्के हडपसर, ३० टक्के पुरंदर आणि ३० टक्के खडकवासला मतदारसंघ माझ्याकडे आहे. मी गेल्या ३ टर्म हडपसरमधून लढलो तिथे ३५ ते ४० हजारांच्या पुढे मतदान जात नाही. त्यामुळे मी खडकवासला मतदारसंघात लढलो तर त्याठिकाणी पावणे २ लाख मतदानावर माझा प्रभाव आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच निवडणुका अगदी १५-२० दिवसांवर आल्यात. महाविकास आघाडीत खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. परंतु एका राष्ट्रवादीचे २ भाग तिथे झालेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली. त्यात २२ हजारांचे लीड सुनेत्रा पवारांना खडकवासल्याने दिले आहे. सचिन दोडके यांच्या मतदारसंघातही १७००-१८०० लीड सुनेत्रा पवारांना आहे. माझ्या प्रभागात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंना आघाडी दिली आहे. जागा कुणाला द्यायची हा वरिष्ठांचा विषय आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठांचा आदेश हा प्रत्येक पक्षातील, प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य करावा लागेल. तो मलाही मान्य असेल असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, जरी खडकवासला मतदारसंघ मविआत राष्ट्रवादीला सुटला तर मला तिथे काम करावेच लागेल, जर आम्हाला सुटला तर माझे काम इतरांना करावे लागेल. प्रत्येकाने महाविकास आघाडीचा जो धर्म असेल तो पाळावा लागेल. मी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरेंकडे खडकवासल्याबाबत बोललो आहे. पक्षातील वरिष्ठांसोबत मी माझी मागणी केली आहे. सातत्याने दीड दोन महिन्यात मागणी करतोय. खडकवासल्यात माझे कार्यक्रम सुरू आहेत. आदेश मिळाला तर मी खडकवासला सर करणार असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचे सचिन दोडके इच्छुक
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा भाजपाच्या भीमराव तापकीर यांच्याकडून अवघ्या २५९५ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. सचिन दोडके यांनी १ लाख १७ हजार ९२३ मते मिळवित अपयशी झुंज दिली होती. आता पुन्हा एकदा या मतदारसंघात सचिन दोडके इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतरही सचिन दोडके शरद पवारांसोबत कायम राहिलेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत मविआकडून ते इथून उभे राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यात वसंत मोरेंनी या मतदारसंघावर दावा केला आहे.