मुंबई – महाराष्ट्रातलं वातावरण कधी नव्हे तेवढे असुरक्षित, अस्थिर, जातीजातीत वाद या सर्वाला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. ज्यादिवशी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र जातीजातीत वाटला गेला. हा महाराष्ट्र सामाजिक, आर्थिकदृष्ट्या एकसंघ असावा यासाठी यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत अनेकांचे कौशल्य होते. परंतु गेल्या १० वर्षात महाराष्ट्राचे जातीधर्मानुसार तुकडे पडतायेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, सरकारवर विश्वास नाही, हेच देवेंद्र फडणवीस बाहेरील राज्यात प्रचाराला चाललेत. त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ हे बारामतीत जाऊन सांगितले होते. हेच देवेंद्र फडणवीस ज्यांनी मविआ काळात आमच्या हातात सत्ता आली तर २४ तासांत मराठ्यांना आरक्षण देऊ म्हटलं होते. मग का देत नाही? त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? आरक्षणाचे फुलबाजे यांनीच उडवले मग आता विझले का? जरांगे पाटील यांनी समाजासाठी प्राण पणाला लावले आहेत. १६ तारखेच्या कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगरला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.
आम्हाला बदनाम करून तुमचे डाग धुतले जाणार नाहीत
अजय अशर नावाच्या बिल्डरकडे चाव्या असतील. असे आरोप करणे, बोलणे यामुळे ५० खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाही. मुंबई, ठाण्यात सध्या बिल्डरांचे राज्य सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. यातून केलेली कमाई देशाबाहेर कशी जातेय आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जातेय हेदेखील माहिती आहे. आम्हाला बदनाम करून तुमचे डाग धुतले जाणार नाहीत असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपावर केले.
आमची लढाई सत्तेसाठी नसून...
इंडिया आघाडीच्या १४ नेत्यांची शरद पवारांच्या घरी बैठक आहे. आज बैठक आहे आणि आजच अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस आली. हा रडीचा डाव आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने अभिषेक बॅनर्जींवर सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. हेमंत सोरेन यांच्यावर दबाव आहे. माझ्यावर दबाव आहे. परंतु आम्ही यातून काहीही झाले तरी या दबावापुढे झुकायचे नाही हेच प्रत्युत्तर आहे. अभिषेक बॅनर्जी आजच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे देशाला संदेश जाईल नेमकं काय झालंय. अभिषेक बॅनर्जी पोहचू नये म्हणून आज ईडीची नोटीस पाठवली. उद्या हेमंत सोरेन यांनाही येईल. आमची लढाई सत्तेसाठी नसून हुकुमशाही उलथवून लावण्यासाठी आहे. त्यामुळे अशा लढाईत वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवले जातात असंही संजय राऊत म्हणाले.
द्वेष पसरवण्याचे काम मोदींनेच केले
राहुल गांधी जे देशाची स्थिती आहे, सत्य आहे ते सांगतायेत, एका विद्यापीठाकडून राहुल गांधींना आमंत्रित केले होते. राहुल गांधींची मुलाखत भाजपा नेत्यांनी ऐकायला हवी. बाहेरच्या देशात जाऊन द्वेष पसरवण्याचे काम सर्वात आधी नरेंद्र मोदींनी सुरू केले. गेल्या ७० वर्षात काय झाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी बाहेर भाषणे कुणी केली त्यांनीच केली होती अशी टीका राऊतांनी केली.