“…त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा, नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:37 AM2023-03-29T08:37:01+5:302023-03-29T08:37:44+5:30
नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही, असे म्हणत ठाकरे गटानं साधला निशाणा.
'हिंदुस्थान म्हणजे पाकिस्तान नाही व पाकिस्तानप्रमाणे येथे विरोधकांना बेगुमानपणे चिरडता येणार नाही. इस्रायलप्रमाणे येथील जनतादेखील लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल,' असे म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.
'जेव्हा एक हुकूमशहा लोकशाहीला उखडून फेकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करते तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात व मोदींचे मित्र, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागते. उद्या कदाचित हेच नेत्यानाहू आपले मित्र मोदी यांच्याकडे राजकीय आश्रय मागतील व मोदी त्यांना दिल्लीतील एखादा बंगला बहाल करून कर्तव्यास जागतील, पण राहुल गांधींना मात्र बेघर करतील, नव्हे केलेच आहे. इस्रायल देशात जे घडते आहे, त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल! देश त्याच दिशेने निघाला आहे,' असे म्हणत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर हल्लाबोल केला.
काय म्हटलेय संपादकीयमध्ये?
'एका मानहानी खटल्यात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द व्हावी म्हणून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली व आता लगेच चोवीस तासांत सरकारने श्री. गांधी यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली आहे. एखाद्यात अतिआत्मविश्वास असू शकतो, पण हा इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. इंग्रजांचे जुलमी सरकार भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वीर सावरकर अशा क्रांतिकारकांशी ज्या निर्घृण पद्धतीने वागले, त्याच निर्घृण रीतीने मोदींचे सरकार आपल्या राजकीय विरोधकांशी वागत आहे,' असे संपादकीयमध्ये म्हटलेय.
'खासदारकी जाताच चोवीस तासांत…'
'राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा आसुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील हे नक्कीच. इतक्या खुनशीपणाने आपल्या देशात कदाचित मोगलांनीही राज्य केले नसावे. आज संपूर्ण दिल्लीतील अनेक सरकारी बंगल्यांवर भाजप व संघ परिवाराचा अवैध कब्जा आहे. निवृत्त होऊन, पराभूत होऊन कधीच ‘माजी’ झालेल्या भाजप खासदारांनी त्यांचे बंगले सोडले नाहीत. संघ परिवाराच्या संस्था व नेत्यांनी त्यांच्या राजकीय कार्यासाठी सरकारी बंगले मिळवले आहेत, पण राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करताच चोवीस तासांत त्यांना राहते घर सोडण्याचे आदेश दिले गेले,' असे यात नमूद करण्यात आलेय.
‘लोकशाही कठीण कालखंडातून जातेय’
नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही. गौतम अदानी यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मदतीने देश लुटला हे आता उघड झाले आहे. त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर जप्ती आली नाही. राहुल गांधी यांनी ज्या सर्व ‘मोदीं’चा नामोल्लेख करून त्यांच्या चौर्यकथांचा पर्दाफाश केला त्यांचीही घरे-बंगले शाबूत आहेत, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांची खासदारकी व घरही आता काढून घेण्यात आले. देशाची लोकशाही किती कठीण कालखंडातून जात आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचा आरोपही यातून करण्यात आलाय.