अकोला: निवडणुकीच्या निकालाअंती जनतेचा काैल शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट)व काॅंग्रेसच्या पारड्यात असल्याचे समाेर आले. शिवसेनेला पक्ष फुटीचे ग्रहण लागल्यानंतरही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाचे नऊ उमेदवार विजयी झाले. यामुळे ठाकरे यांनी आगामी हाेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीसाठी विदर्भावर ‘फाेकस’केला असून २० जून राेजी विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत अकाेला जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी दाखल हाेत आहेत.
लाेकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करीत ४८ पैकी ३० जागांवर विजयश्री प्राप्त केला. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही नंतर काॅंग्रेसला पाठिंबा दिल्याने ही संख्या ३१ झाली आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे)व राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)यांनी स्थापन केलेल्या महायुतीच्या वाटेला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला असून आगामी ऑक्टाेबर महिन्यांत हाेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्षांनी चाचपणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाला सुरुवातीपासूनच मुंबइ, काेकण पाठाेपाठ विदर्भाची साथ मिळाली आहे. त्यामुळे की काय, ठाकरे गटाने विदर्भावर लक्ष्य केंद्रित केले असून पक्षाचा जिल्हानिहाय तसेच विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्याची जबाबदारी विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्यावर साेपवली आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भाचा आढावासेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत २० जून राेजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल हाेणार आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकाेला, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पक्ष बांधणीचा आढावा घेतील. बुलढाणा येथून सायंकाळी अकाेला शहरात येऊन बैठकीत विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा करतील. शिवसैनिकांसाेबत संवादआगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आयाेजित बैठकीत शिवसैनिकांसाेबत संवाद साधल्या जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता गाेरक्षण राेडस्थित मंगलकार्यालयात आढावा बैठकीच्या नियाेजनासाठी आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर व त्यांची चमू कामाला लागली आहे.