मुंबई - १९९३ च्या दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीत संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असं बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले होते. दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे होते असा मोठा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्धव ठाकरे सातत्याने दंगली भडकवण्याचा आरोप करतायेत. ९ महिन्यापासून आमच्या सरकारवर असे आरोप करतात पण १३ ऑगस्ट २००४ मातोश्रीत एक बैठक झाली. त्या बैठकीत स्थानिक लोकाधिकारी समितीचे सरचिटणीस आणि एक खासदार जे आता शिंदेंसोबत आहेत. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दंगली घडवण्याचं प्लॅनिंग केले होते असा आरोप त्यांनी केला.
तसेच ९ महिने महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे का याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे. मालवणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेत उद्धव ठाकरेंचा हात आहे का याची चौकशी करावी. १९९९ पासून आजपर्यंत उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतायेत. उद्धव ठाकरे हा किती कपटी आहे, हे मी तारखेसकट आणि पुराव्यासकट बोलतोय. राज्यात दंगल घडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंनाच धरले पाहिजे अशी मागणीही आमदार नितेश राणेंनी केली.
संजय राऊत भूमाफियाराऊत आमच्या नेत्यांना भाषण माफिया बोलतात, पण तू किती मोठा भूमाफिया आहे? याचे पुरावे महाराष्ट्राला देतो. अलिबागच्या किहिम बीचवर तुला प्लॉट हवा होतो म्हणून एका मराठी कुटुंबाला दमदाटी करून ही जमीन बळकावली. किहिम बीचवर रिसोर्ट बांधण्यासाठी कवडीमोल दरात जमीन घेतली. भांडूप, विक्रोळी परिसरात R या अक्षरावरून सुरू होणाऱ्या बिल्डरसोबत तुझी पार्टनरशिप आहे. तू किती जणांची जमीन बळकावली आहे याचेही उत्तर राऊतांनी द्यावे असं नितेश राणे म्हणाले.
त्याचसोबत मराठी माणसाच्या हितासाठी बेळगावत जाऊन भाषण केल्याचा दावा करणाऱ्या राऊतांनी पत्राचाळीतील मराठी लोकांची घरे लाटली, आज कोर्टात त्यामुळे हजेरी लावायची आहे. स्वत: जामीनावर बाहेर आहे. या प्रकरणातून सुटका झाली नाही. बेळगावच्या मराठी जनतेला सांगेन, लुटारू, दरोडेखोर, फसवणूक करणाऱ्या माणसाला बळी पडू नका. चपट्या पायाचा घरफोड्या माणसाचे ऐकून चुकीच्या लोकांना मतदान करू नका. बेळगावच्या जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा असंही नितेश राणेंनी आवाहन केले.
दरम्यान, बाळासाहेबांना संजय राऊतांना अनेकदा त्रास दिला. विविध लेख बाळासाहेब आणि शिवसेनाविरोधात लिहित होता. हा माणूस महाविकास आघाडी आणि शरद पवारांची किती वाट लावतोय हे आता मविआ नेत्यांना दिसतोय. मविआ एकत्र ठेवायची आहे मग कुणाच्या सांगण्यावरून हे अग्रलेख लिहितोय हे जाहीर करावे. संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊतांनी उत्तरही दिले नाही. आतमधून हालचाली आहे. राऊत राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहे असा दावा पुन्हा एकदा नितेश राणेंनी केला. जितेंद्र आव्हाडांना इशाराजितेंद्र आव्हाड यांनी द केरळ स्टारी निर्मात्याला फाशी देण्याची भाषा केली, आम्हालाही फटके देण्याची भाषा करता येईल. महाराष्ट्रात सक्षम गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. बाळासाहेबांच्या कडवट विचारांना मानणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आव्हाडांनी अशी भाषा करू नये. गृहमंत्रालय आव्हाडांच्या वक्तव्याची योग्य दखल घेऊन कारवाई करेल असा विश्वास आहे. सिनेमाच्या निर्माते, कलाकार यांच्या केसालाही धक्का लागला तर जितेंद्र आव्हाडांची काय अवस्था होईल याचा विचार करा असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला.