नागपूर - आमदार अपात्रतेप्रकरणी विधान भवनात अध्यक्षांकडे सुनावणी पार पडत आहे. यावेळी उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतानाच एकनाथ शिंदेंसमोर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भाजपासोबत सरकार स्थापनेचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला.
उदय सामंत यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी सुरू आहे. त्यात वकील कामत यांनी सामंतांना प्रश्न विचारला की, तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्यानुसार, निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने केल्या महाविकास आघाडीमुळे नाराज होता हे खरे की खोटे? यावर सामंत यांनी होय मी नाराज होतो, मी आणि माझ्या सहकारी आमदारांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंना विनंती केली होती. त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी भेट घेऊन आमदारांचे म्हणणं त्यांच्यासमोर मांडले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. पक्ष संघटनेतील बहुतांश ज्यात लोकप्रतिनिधीही आहेत त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता असं त्यांनी म्हटलं.
तसेच २१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही. मी या बैठकीला उपस्थित होतो. परंतु त्या दिवशी आणि त्यानंतरही मला कोणताही व्हिप देण्यात आला नाही. मी तो स्वीकारला नाही आणि कुठल्याही कागदावर माझी सही नाही. व्हिप हा सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी असतो अशी मला माहिती आहे. माझ्या हातात जे पत्र दिले त्यावर माझी सही नाही असंही उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, मी चार वेळा विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. २ वेळा राष्ट्रवादी आणि २ वेळा शिवसेना.२०१४ वेळी सर्वच पक्ष निवडणूक स्वबळावर लढवत होते.शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती होती. २०१९ मध्ये याच युतीने निवडणुकीला सामोरे गेलो. ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो तेव्हा ते का झाले हे मलादेखील माहिती नाही. मी गुवाहाटीला कधी गेलो याबाबत निश्चित तारीख आठवत नाही. २४ किंवा २५ जूनला गेलो असेन. ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो. तेव्हा जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो भविष्यात तशीच कार्यवाही होईल. काही काळानंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपासोबत सरकार स्थापन करू असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली असं सामंत यांनी म्हटलं.