महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जबरदस्त हल्ला चढवला आहे. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कसलेही आश्वासन देण्यात आलेले नव्हते. एवढेच नाही, तर शिवसेनेवर बेईमानीचा आरोप करत, या बेईमानीचा बदला घेतल्याचा आपल्याला आनंद आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
महाराष्ट्रात 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. पण निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांत मतभेद झाले. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले. पण यानंतर, गेल्या जून महिन्यात शिवसेनेत मोठे बंड झाले. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीस म्हणाले, आम्ही विरोधात होतो, ज्या पद्धतीने शिवसेनेने आमच्यासोबत बेईमानी केली होती. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आम्ही नुश्चितपणे पुन्हा येण्याची संधी शोधतच होतो. आम्ही काही येथे तपस्या करण्यासाठी किंवा साधू संत होण्यासाठी आलेलो नाही. आम्ही तर राजकीय नेते आहोत. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे आमच्यासोबत बेईमानी झाली तर आम्ही त्याचे उत्तर देणारच.
याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच, बदला घेतल्याचा मला आनंद आहे -खरे तर, याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल. कारण आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यासोबत (एकनाथ शिंदे) ज्या पद्धतीचा व्यवहार होता, त्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता कुणी बाहेर पडत असेल आणि आम्हाला हे समजले, की ते बाहेर पडले आहेत, तर आम्ही काही असे तर म्हणणार नाही ना, की नको-नको शिंदे जी आपण परत जा आणि उद्धवजींसोबतच बसा. आम्ही तर असेच म्हणून, की फारच छान! बाहेर पडलात, आम्हालाही आमचा बदला घ्यायचा आहे. आम्ही आपल्याला साथ देण्यास तयार आहोत. तर हो आम्ही शंभरटक्के केलं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती त्याचा बदला घेतला.