मुंबई - काहीजण गुंडगिरीची भाषा करून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतायेत. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात कुठलाही हल्ला होणार नाही याची काळजी घ्यावी. सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही शासकीय संस्थांची आहे. गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील जनता माफ करणार नाही असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ अधिवेशनापार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी विधानसभा उपाध्यक्ष आणि विधिमंडळ सचिवांनी भेट घेतली. आजारी आमदारांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी केली. त्याचसोबत आमदारांच्या सुरक्षेबाबतही चर्चा केली. उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाचा आढावा घेतला.
यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अल्पमतातील सरकार लोकशाहीत जबरदस्ती का करतेय? तुमचे आमदार टिकले नाही आणि भाजपावर, राजभवनावर टीका करायची. सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालणार नाही. गेल्या अडीच वर्ष सरकारने जनतेसोबत बेईमानी केली. दारूवरील कर हटवले. गुंडगिरीचा प्रयत्न जनता खपवून घेणार नाही. सरकारने बहुमत गमावले आहे. शिवसेना आमदार गुवाहाटीतून काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा असं वारंवार म्हणत आहेत. परंतु हे जनतेने निवडून दिलेल्या आमदारांची साथ सोडण्यास तयार आहेत परंतु शरद पवारांची साथ सोडत नाही. धमक्या येत असल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला संरक्षण देण्याचे आदेश दिलेत असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री होता यावा, फक्त खुर्ची तोडण्यासाठी, एखाद्याने मुकुट घालण्यासाठी लोकशाही नव्हे. ही लोकशाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर करावा यासाठी आहे. एका माणसाने मुख्यमंत्री व्हावं आणि साडे बारा कोटी जनतेनं दु:ख सहन करावं यासाठी लोकशाही आहे का? सरकारला बहुमत की अल्पमत ही परीक्षा द्यायची आहे आम्ही वेट अँन्ड वॉच ठेवला आहे. तर एका तासातही दाखवू शकता. स्वत:चे आमदार, जनतेचे न ऐकता पवारांना जीवन अर्पण केलंय. खुर्चीसाठी जनतेशी गद्दारी केली. अवमान केला त्याचे हे फळ आहे असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे.