मुंबई- आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला. आयोगाने पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आजचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. आजचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना मिंध्ये गटला दिले आहे, त्यावरुन लवकरच निवडणुका होतील असे वाटत आहे. मुंबईला भिकेचा कटोरा देऊन मुंबई दिल्लीश्वराच्या हातात देण्याचा डाव आहे. कदाचित पुढे आमची मशालही घेतील, पण मशाल आता पेटलीये आहे. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अनेकांना वाटलं असेल शिवसेना संपली, पण शिवसेना लेचीपेची नाही. शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
'रामाकडे धनुष्यबाण होता आणि रावणाकडेही धनुष्यबाण होता. पण सत्याचाच विजय होणार. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्ट्र नाही. हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथे निकाल आमच्या बाजूने लागेल. धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिकडं जल्लोष सुरू असेल. आपली चोरी पचली म्हणून चोर जल्लोष करत असतील. पण चोरी ही चोरीच असते. आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार, तोपर्यंत यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनी खचू नका, मी खचलो नाहीये. ही लढाई शेवटपर्यंत आपल्याला लढावी लागेल. हिम्मत सोडू नका, विजय आपलाच होणार. मैदानात उतरलो आहोत, विजयाशिवाय परत यायचे नाही. यांनाना शिवसेनाप्रमुखांचा फोटो, नाव चोरावे लागत आहे. हे नामर्दांनो जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.