मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. 'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'हे कोणतं हिंदूत्व आहे...काय आहे आपलं स्वप्न...मी तुम्हाला भडवण्यासाठी आलो नाही. मी तुमचे डोळे उघडण्यासाठी आलो आहे. हेच आपले हिंदूत्व आहे का..?ज्या मार्गाने हे आपल्याला घेऊन जात आहेत, त्या मार्गाने देशाची बदनामी होईल. पूर्वी हिंदू आहे बोलायला भीती वाटायची, भविष्यात लाज वाटेल. राम मंदिराचे प्रकरण शांत झाले होते, आम्हीच ही मागणी लावून धरली. मी अयोध्येला गेले होतो, तिथे जाण्यापूर्वी शिवनेरीची माती घेऊन गेले होतो. त्यानंतर राम मंदिराचा निर्णय झाला आणि मीही मुख्यमंत्री झालो. आपण एकच आहोत, आम्ही राम-राम म्हणतो अन् तुम्ही श्रीराम म्हणता.'
'यांचे हिंदूत्व झोपले होते, तेव्हा माझ्या वडिलांनी यांना उठवलं आणि आता गरज सरल्यावर आम्हाला सोडून दिलं. माझे वडील म्हणायचे, राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदूत्व आहे. मनात राम आणि हाताला काम पाहिजे. कुणावर अन्याय करू नका आणि अन्याय सहन करू नका, असे आमचे हिंदूत्व आहे. आज अनेक उत्तर भारतीय एकत्र येत आहेत. आता मुस्लिमही आमच्यासोबत येत आहेत. आपल्याला आपल्या स्वप्नातला देश उभा करायचा आहे. आपला भारत स्वातंत्र आहे, पण हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. भाजपकडे हिम्मत नाही आणि स्वतःला हिंदूंचा नेता म्हणतात. मी आजही त्यांना आव्हान देतो, निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत,' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.