मुंबई - एमएमआरमधील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. जे निकषात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले. घाटकोपर येथे १३ मे रोजी जाहिरात होर्डिंग कोसळून १७ जणांचा दुर्दैवी म़त्यू झाला होता. या प्रकरणाची निवृत्त न्या. भोसले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. विधानसभेत उद्धव ठाकरेंवर झालेल्या आरोपांचीही चौकशी समिती करेल, असे ते म्हणाले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ कैसर खालिद या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करून चालणार नाही तर दोषी असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. भाजपचे राम कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली.
भावेश भिंडेसोबतच्या फोटोवरून पुन्हा जुंपली
होर्डिंगबाबतचे धोरण तयार असून, आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच ते हरकती आणि सूचनांसाठी खुले करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. या होर्डिंग प्रकरणातील दोषी भावेश भिंडेंचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोटो कसा काय? असा सवाल करत भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. कोरोना काळातच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च्या नावाखाली होर्डिंगवाल्यांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असून, यामागच्या कटकारस्थानाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी झाली. हे सर्व मुद्दे निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीकडे दिले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
नितेश राणे - सुनील राऊत आमने-सामने यावेळी भाजप आमदार नितेश राणे आणि उद्धवसेनेचे आ. सुनील राऊत यांच्यात शाब्दीक चकमक झाली. होर्डिंगच्या कंपनीचा मालक भावेश भिंडे हा सुनील राऊत यांचा पार्टनर होता, असे राणे म्हणाले. कोरोना काळात ‘मातोश्री’वर आमदारांना प्रवेश नव्हता, मग या भिंडेला तिथे घेऊन जाणारा आमदार कोण? याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले. त्यावर भिंडेसोबतचा व्यवहार सिद्ध झाला तर मी इथेच राजीनामा देईन, असे राऊत म्हणाले.