नाशिक : येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, हॉकी व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल मैदानासह निसर्ग उद्यान असे विविध प्रकल्प साकारण्यात आली आहेत. या क्रीडांगणासह 24 गुंठ्यात उभारलेले नैसर्गिक मल जलशुद्धीकरण प्रकल्प अर्थात निसर्ग उद्यानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.9)उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक संजय कुमार, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.नाशिकच्या त्र्यंबकरोड वरील तब्बल शंभर एकर जागेत असलेल्या ब्रिटिशकालीन महाराष्ट्र पोलिस अकादमीला सुमारे शंभर वर्षांचा इतिहास आहे. येथे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी घडविले जातात. त्यांना अद्यावत शास्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. अकादमीच्या विविध सुसज्ज प्रकल्पांमध्ये नव्याने कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, हॉकी मैदान तसेच व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल मैदानासह जैवविविधता जोपासना करणारे निसर्ग उद्यानाची भर पडली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस अकादमीच्या कंपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, निसर्ग उद्यानाचे उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 2:39 PM