गेल्या काही दिवसांपासून देशाचं इंग्रजीमधील इंडिया हे नाव बदलून भारत करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज आटोपलेल्या जी-२० बैठकीतही देशाच्या नावाचा भारत असा उल्लेख करण्यात आल्याने या शक्यतेला बळ मिळत आहे. दरम्यान, आज जळगावात झालेल्या सभेमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाच्या नामांतरावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत हा आमचा आहे, आम्ही त्याला इंडिया म्हणू नाहीतर हिंदुस्थान पण म्हणू, देशाला स्वत:चं नाव दिलं नाही हे नशीब, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
देशाच्या इंग्रतील नामांतराच्या मुद्द्यावरून मोदी आणि भाजपाला टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे आधी म्हणायचे की आम्हाला विरोधकच नाही. पण आता एवढे घाबरले आहेत. इंडिया नावाची यांना खाज सुटली आहे. म्हणूनच पक्ष फोडाफोडी सुरू केली आहे. एकवेळा आग्यामोहोळाचा डंख परवडला पण यांची खाज नको, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ही लोकं देशाला भारत म्हणताहेत हे नशीबच म्हटलं पाहिजे. देशाला त्यांचं स्वत:चं नाव दिलं नाही हे नशीब. लक्षात ठेवा भारत आमचा आहे. आम्ही त्याला इंडिया म्हणू आणि हिंदुस्तानही म्हणू. आता आम्हीसुद्धा बदल करणार आहोत. आम्ही देशाचा पंतप्रधान बदलणार आहोत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.