गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आणि मोदी शाहांविरोधात कमालीचे आक्रमक झालेले आहेत. यादरम्यान, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनाही लक्ष्य करून त्यांच्याबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत. मात्र राहुल गांधींच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला अजिबात पटणार नाही. आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
सावरकरांच्या अपमाना्च्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, राहुल गांधींना आम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेलात. आम्ही तुमच्यासोबत होतो. संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये तुमच्यासोबत सहभागी झाले होते. ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.
ते पुढे म्हणाले की, सावरकर काय होते हे केवळ आपण वाचू शकतो. पण सावरकरांनी काय केलं होतं. तेव्हाचा तो सगळा काळ जर डोळ्यांसमोर आणला, तर दिसेल की, चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर १५ वर्षांचा मुलगा घरातल्या अष्टभूजा देवीसमोर शपथ घेतो, की देशासाठी देशाच्या शत्रूला चाफेकर बंधूंसारखा मारत मारत मरेन किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन.
सावरकरांचे वडील हे टिळक भक्त. सावरकरांनी जे काही केलं आहे ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही.१४ वर्षे रोज मरण यातना भोगल्या. छळ सोसला. हे सुद्धा एकप्रकारे बलिदानच आहे. जसे क्रांतिकारक फाशी गेले. गोळ्या खावून बलिदान दिलं. तसंच १४ वर्षे मरणयातना सोसणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. म्हणून राहुल गांधींना सांगतो की, आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका. तु्म्हाला डिवचलं जातंय. मात्र आता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंताही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.