Uddhav Thackeray Interview, BJP Rane vs Sanjay Raut: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षातील विविध गोष्टी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी बंडखोरी करत ठाकरेंची साथ सोडली. शिवसेना पक्ष, नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ठाकरे यांच्या सोयीचे प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला होता. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार गटाचा प्रवेश झाला. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं. साहजिकच, या मुलाखतीवर ठाकरे विरोधकांच्याही प्रतिक्रिया आल्या. भाजपाच्या एका आमदाराने ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका करत असताना, संजय राऊतांचाही समाचार घेतला.
"संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. खरे सांगायचे तर सध्याच्या घडीला राऊत आणि ठाकरे हे दोघेही बेरोजगार आहेत. त्यामुळे याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मला सध्या इतकंच वाटतं की, पगारी नोकराला घरात बसून मुलाखत देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी तोच वेळ विधानपरिषदेत घालवावा आणि जनतेचे प्रश्न सोडवावे," अशी विखारी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ठाकरे आणि राणे यांच्यातील संघर्ष सर्व महाराष्ट्रात सुपरिचित आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मुलाखतीवर राणेंनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
ठाकरे पिता-पुत्रांसह 'मविआ'ला इशारा
"मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेत दालन सुरू केले. त्याने आदित्य ठाकरेंना मिर्ची लागली, दोन तीन दिवसांपासून त्यांचे 'म्याव म्याव' सुरू आहे. जनतेच्या समस्या सोडवायला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक दालन घेतलेले आहे. ठाकरे सरकारच्या काळात पालकमंत्री अस्लम शेख यांना मुंबई पालिकेचा बंगला दिला होता. वसुली आणि टक्केवारीसाठी त्यावेळी पालिकेच्या बंगल्याचा वापर केला जात होता. जुन्या महापौर बंगल्यात वसुली व्हायची. वैभव चेंबर चौथ्या मजल्यावर बॉलिवूडचे लोक आणि इतर कोण-कोण भेटायला यायचे, आम्हाला माहिती आहे," अशा शब्दांत त्यांना ठाकरे पित्रा-पुत्रांसह 'मविआ'ला इशारा दिला.