मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनासह शिक्षणाच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
कोरोनाच्या संकटात शिक्षणाचा खेळखंडोबा किंवा बट्ट्याबोळ आहे की नाही?, कोरोनाच्या या कठीण काळात तरुणांनी, मुलांनी शिक्षणाचं काय करावं असा प्रश्न राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच ई-लर्निंग शिवाय सध्या पर्याय नाही. यासाठी सगळ्या बाजूंनी आपण मतमतांतरेही घेत आहोत. महाराष्ट्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात मार्ग काढला असून निर्णय घेतल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.
"शिक्षण हे जीवनावश्यक गोष्टींपैकी एक आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्यासाठी आपणही खूप विचार करून काम करतोय. आता बघा. जुलै जवळपास संपत आला. जूनमध्ये खरं तर शाळा सुरू होतात. आता शाळा कधी सुरू होणार? या मुद्द्यावर मी माझी संकल्पना मांडली ती हीच की, आता शाळा हा अस्तित्वात असलेला कन्सेप्ट तूर्त बाजूला ठेवा. शिक्षण कधी सुरू होणार यावर माझा भर आहे. आपण त्यासाठी हाही विचार केला की, ग्रामीण भागात जिथे जिथे तिथे शाळा सुरू कराव्यात का? आणि जिथे शक्य आहे. सुविधा आहेत तिथे ऑनलाईन शिक्षण सुरू करावं का?, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आपल्याला खूप झाले आहेत. त्यासाठी आपण केंद्र सरकारशीही बोलतोय. आता खरं तर शिक्षण एकतर्फीच होणार. जसं माझं फेसबुक लाईव्ह होतं. तसंच ते होणार आहे. टीव्ही चॅनेलवरून शिकवता येईल का यावरही आपण काम करतोय. त्याशिवाय मुंबई महापालिकेच्या शाळेत आपण एसडी कार्ड लोड करून टॅब दिले आहेत. तासाही प्रयत्न होतोय. त्यात ई-लर्निंग आहे. त्यात पाठ्यपुस्तकं आहेत असे प्रयत्न सुरू आहेत" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात राज्यपालांची वेगळी भूमिका आहे. त्याशिवाय यूजीसीची भूमिका ही परीक्षा घ्यावी अशी आहे. यातून कसा मार्ग काढणार हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. "महाराष्ट्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात मार्ग काढलाय आपण. परीक्षा होऊ नये असं कुणाचं मत नाही. माझंही तसं मत नाहीय. माझंही मत आहे परीक्षा व्हावी, पण हे काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. आपण अंतिम वर्षाच्या मुलांना जी काही आता सेमिस्टर झालीत त्याचे अॅग्रीगेट करून मार्क देऊन त्यांच्य आयुष्यातला अडथळा दूर करावा, त्यांना पास करावे, सरासरी मार्क देऊन त्यांना रिझल्ट द्यावा, ज्यांना कुणाला वाटतं की मी याच्याहून चांगली कामगिरी बजावू शकतो त्यांची आपल्याला शक्य होईल तेव्हा परीक्षा जाहीर करून परीक्षा घेऊ. ज्यांना असे वाटतंय की, परीक्षेला बसायचंच तेव्हा त्यांनी बसावं आणि तेव्हा मात्र त्यांन एकच काय तो निर्णय घ्यावा लागेल. एकतर अॅग्रीगेट केलेल्या मार्कांच्या रिझल्ट घ्या किंवा परीक्षेचा" असं मुलांच्या शिक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'
कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अॅप्सवर घालणार बंदी
CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...
CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू