मुंबई - शिवसेनेत झालेलं अभूतपूर्व बंड, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची ओढवलेली नामुष्की, पक्षाच्या अस्तित्वावर आलेलं संकट या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून एक प्रदीर्घ मुलाखत देत सर्व प्रश्नांची उत्तरं देत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी कट्टर राजकीय वैर असलेल्या नारायण राणे यांनीही या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण होत आहे. त्यांची चिंता वाटत आहे. अडीच वर्ष सत्तेवर असताना त्यांना शिवसैनिक आठवला नाही. हिंदुत्त्व आठवलं नाही आणि मराठी माणूसही आठवलं नाही. आता मुलाखलीतून सविस्तर आपलं मत मांडत आहेत. सत्ता गेल्यानंतर तडफडणं म्हणतो त्या भावनेतून एक केविलवाणा प्रयत्न, व्यथा या मुलाखतीच्य माध्यमातून त्यांनी देशासमोर मांडली आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपद गेल्याने व्याकूळ झाले आहेत. मुख्यमंत्रिपद गेल्याने मला कुठलंही दु:ख नाही, असं ते म्हणताहेत. पण उद्धव ठाकरेंना मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्षे ओळखतो. अंगात खोटारडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दुष्ट बुद्धी आहे. अशी व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसून त्यांनी अडीच वर्षांत ना जनतेचं, ना शिवसैनिकांचं ना हिंदुत्वाचं कोणतही हीत वा कुठलंही काम केलं नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
यावेळी आपल्या आजारपणावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यावरूनही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, आता या मुलाखतीत मी आजारी होतो. माझं ऑपरेशन झालं, मी शुद्धीवर नव्हतो. तेव्हा गद्दारांनी सरकार पाडलं, असे ते म्हणताहेत. ते शिवसैनिक होते. ते निवडून आले. सत्ता आणली आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी जुळलं नाही. ते पक्षपात करू लागले. तेव्हा त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्या नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले. स्वत:चं पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने पोटशूळ उठल्याने ही मुलाखत घ्यायला लावली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.