सोलापूर - उद्धव ठाकरे यांचा आता रडोबा झाला आहे. आता त्यांनी रडणे सोडावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. बावनकुळे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये नेते होते. उद्धव ठाकरे मात्र रणांगणातून पळून गेले. आमदार सोडून गेले त्याच दिवशी उद्धव ठाकरे हरले. त्यांच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिंदे आणि फडणवीस सरकारला असंवैधानिक म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत आहेत. पक्ष संपत चालला तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. शरद पवार यांनाही त्यांच्यासोबत आघाडी करून निर्णय चुकला असे वाटते, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीने न्यायालयातून माघार घ्यावी, लगेच निवडणुका लागू
महापालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसमुळे थांबल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली. ही प्रभाग रचना शिंदे आणि फडणवीस सरकारने बदलली. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादीने याचिका मागे घ्यावी लगेच निवडणुका लागतील असेही बावनकुळे म्हणाले