Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहेत, असे म्हटले. त्यांची ही टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिव्हारी लागली आणि त्यांनी आठ मुद्द्यांमध्ये कलंक कशाला म्हणतात याचे ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले. तरीदेखील फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकारण तापले आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून, रात्री ठाकरेंविरोधात भाजयुमोकडून आंदोलन करत त्यांचे होर्डिंग्ज फाडण्यात आले. त्यातच आता भाजपा अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे हा कलंक शब्दांचे दुसरे नाव असल्याचे त्यांनी म्हटले.
"उद्धव ठाकरे, एका आरशात बघा. तुमचे हात पालघर साधूंच्या रक्ताने बरबटले आहे, हात मनसूख हिरेनच्या रक्ताने माखले आहेत, मातोश्रीची तिजोरी कोविड घोटाळ्याच्या पैशांनी भरली आहे. स्वार्थासाठी सख्ख्या भावाला तुम्ही घरातून काढलंत. आपल्या वडिलांना तुम्हाला नीट जेवू घालता आलं नाही. आपल्या वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनिया गांधींच्या पदराला नेऊन बांधला आणि तुम्ही कलंकाची भाषा करताय? कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उध्दव ठाकरे. म्हणून सांगतो बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’ असणाऱ्या उद्धव ठाकरेंची ‘देवेंद्र फडणवीस’ हे नाव घेण्याची लायकी नाही!" अशा शब्दांत आचार्य तुषार भोसलेंनी उद्धव यांच्यावर जोरदार टीका केली.
फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर!
देवेंद्र फडणवीसांनी 'कलंकीचा काविळ' नावाने ट्विट केले आणि त्यात खालील मुद्दे मांडले.
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
असे आठ मुद्द्यांमध्ये फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली.