अमरावती : जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला 14 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलायची लायकी नाही, असं म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबईमधील दादर येथील हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस, बांगलादेशमधीलहिंदूवरील अत्याचार आणि तेथील इस्कॉनच्या मंदिर तोडफोडीवरून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला होता. याचवरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. त्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
नवनीत राणा म्हणाल्या की, जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला १४ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले. आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? आज ते देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत. जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही, देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे. यावर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाने मोर्चे काढले, निषेध व्यक्त केला. तेव्हा जनाब उद्धव ठाकरे कुठे होते? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आज टीका करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
याचबरोबर, तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे, असा टोला देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच, फक्त टोमणे मारायचे आणि विरोध करायचा हेच काम तुम्ही केलंय म्हणून आज तुम्हाला जनतेने घरी बसवलंय तेव्हा आता तुम्हाला हिंदुत्व आठवलेय पण विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने चोख उत्तर दिले आहे, असेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, मुंबईमधील दादरमध्ये रेल्वे स्टेशनजवळ गेल्या ८० वर्षांपासून असलेल्या श्री.हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस भाजपने पाठवली आहे. विशेष बाब म्हणजे ते मंदिर एका हमालाने मेहनत करुन बांधले आहे. ती पाठवलेली नोटीस माझ्याकडे आहे. त्या नोटीसीमध्ये लिहिलंय की, तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे, ८० वर्षापूर्वीचं मंदिर भाजप पाडायला निघाले आहे. मग भाजपचं हिंदुत्त्व कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतं आहेत. आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. मात्र, विश्वगुरु शांत का आहेत? नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत? तुम्ही युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं. मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे? तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.