सावंतवाडी :
शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले. पण या सगळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत त्यांनी स्वतःच ही राजकीय आत्महत्या केली आहे अशी टिका ही केली.
ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, संदीप कुडतरकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुकाध्यक्ष महेश धुरी, विनोद सावंत, राजू बेग,जावेद खतीब,गुरूनाथ सावंत,रविद्र मडगावकर,मोहिनी मडगावकर,केतनआजगावकर,अमित परब, आनंद नेवगी आदि उपस्थित होते.
राणे म्हणाले, मी शिवसेनेतून त्यावेळी एकटा बाहेर पडलो होतो त्याचा परिणाम शिवसेनेवर नक्कीच झाला माझे त्यावेळचे बंड आणि आता चाळीस आमदारांनी केलेला बंड यांच्यामध्ये मोठा फरक आहे आणि विषयही वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेची पडझड होत असल्याचे शल्य जरूर आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीच्या हंगामामध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी लक्ष देणार आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती करू पण सोयीच्या ठिकाणी करू जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये स्थानिक विचाराने ठरवले जाईल.
मनसेचे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी अंधेरी पोट निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी मागे घ्यावी आणि रमेश लटके यांच्या पत्नीला पाठिंबा द्यावा असे पत्र दिले आहे मी त्यावर काही बोलणार नाही. असे सांगत विषय टाळला मात्र राणे यांनी शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव व उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टिकेचा समाचार घेतला.या तिघांनी पुढ्यात येऊन बोलावे यातील कोणाला रोजगार तरी दिला काय मी अनेकांची घरे बांधून दिली कोणाला उध्वस्त केले नाही जर मी बोलायला लागलो तर हे सर्व जण वाहून जातील, अशी टिका ही राणे यांनी केली.आमदार वैभव नाईक यांनी गौरमार्गाने संपत्ती मिळवली असेल तर त्यांची चौकशी होईल. सरकारला पाठिंबा देण्यासाठी त्यांना यात गुंतवले जाते हा आरोप पूर्ण पणे खोटा असून सरकार पूर्ण बहुमत असताना नाईक यांची सरकारला गरज तरी काय असा सवाल ही मंत्री राणे यांनी उपस्थित केलाआमच्या काळामध्ये अडीचशे कोटीचा नियोजन आराखडा होता पण आता तो 170 कोटी झाला याला जबाबदार कोण असा सवाल करत आता आमचे सरकार आहे त्यामुळेच विकास ही जलद होईल असे सांगितले.तसेच प्रकल्प ही मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात येतील असे सांगितले.