जमीर काझी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांपाठोपाठ मावळचे खासदार श्रीरंग बारणेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक विधिमंडळ व संसदेतील रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व शून्य झाले आहे. ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असून त्यांच्या बंडामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक असलेल्या १२ खासदारानी सेनेपासून वेगळी चूल मांडली आहे. त्यामध्ये बारणे यांचा समावेश आहे. त्यांच्या मावळ मतदार संघातील पनवेल, उरण व कर्जत खालापूर हे तीन मतदार संघ रायगड जिल्ह्यातील आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी शिंदे यांचा झेंडा हाती घेतला. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी साथ देत सेनेला मोठे खिंडार पाडले होते.
मात्र, सत्ता स्थापनेवेळी खासदार बारणे यांची भूमिका अस्पष्ट होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गट पुन्हा आक्रमक झाला. २० जूनपर्यंत जिल्ह्यात शिवसेनेचे ३, भाजपचे २ व राष्ट्रवादीचे १ आमदार तर राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक खासदार असे संख्याबळ होते. मात्र सेनेच्या तिन्ही आमदार, खासदारानी बंडखोरी केल्याने ठाकरे यांच्या हाती भोपळा आला आहे.
बंडखोरीमुळे जर्जर
गेल्या २० जूनपर्यंत जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे एक आमदार तर राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक खासदार असे संख्याबळ होते. मात्र सेनेच्या तिन्ही आमदार, खासदारानी बंडखोरी केल्याने ठाकरे यांच्या हाती भोपळा आला आहे.आहे.