"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच"; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 06:15 PM2024-08-17T18:15:59+5:302024-08-17T18:23:06+5:30
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली असली तरी आता संजय राऊत यांनी म्हत्त्वाचे विधान केलंय.
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरु झालीय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार गटानेही प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र शुक्रवारी मुंबईत झालेल्या मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मविआतील नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असं म्हटलं होतं. त्यानतंर आता खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मनात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असल्याचे विधान केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला आम्ही बिनशर्त पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा आणि मगच निवडणूक प्रचाराला सुरुवात करा, असे उद्धव म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर काँग्रेस आणि शरद पवार गटाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानतंर आता संजय राऊत यांनी मला मुख्यमंत्री करा असे उद्धव ठाकरे म्हणाले नसल्याचे म्हटलं आहे. संजय राऊत नागपुरात बोलत होते.
"जागावाटप लवकरच होणार आहे. कोणतीही अडचण नाही. मुंबईत महाविकास आघाडीचा मोठा मेळावा झाला. तिथे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागावाटपावरुन मतभेद नसल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंना पुढे येण्याची गरज नाही. २०१९ सालीही ते मुख्यमंत्री होण्यासाठी पुढे आले नव्हते. सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगले काम केले. उद्धव ठाकरे यांनी कधीच म्हटलेलं नाही की, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असेल तर समोर आणावा. त्याला उद्धव ठाकरे समर्थन देण्यासाठी तयार आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे आहेत," असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याचा स्वाभिमान जपण्यासाठी लढा द्यावा लागेल, असं म्हटलं. आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो. इथं शरद पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.