Sanjay Raut vs Chitra Wagh: एकनाथ शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडी हा वाद दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शिवसेनेला एकावर एक धक्के बसू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेने दहिसर येथे एक मेळावा घेतला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले. "ज्याने बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील, त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू", असं खळबळजनक विधान संजय राऊतांनी केलं. त्यावर भाजपाच्याचित्रा वाघ यांनी राऊतांना कम्पाऊंडर म्हणत जोरदार टोला लगावला.
कोरोना काळात पहिल्या लाटेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. त्यावेळी बोलताना, संजय राऊतांनी डॉक्टर आणि कम्पाऊंडर यांच्याबाबत एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. 'मी आजारी पडलो की डॉक्टरपेक्षाही कम्पाऊंडरकडूनच औषधे घेतो. कारण कम्पाऊंडरला डॉक्टरपेक्षाही जास्त माहिती असते', असे विधान राऊतांनी केले होते. त्यानंतर राऊतांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. तसेच, सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना टोला लगावत कम्पाऊंडर म्हणण्यासही सुरूवात केली होती. याच मुद्द्याचा आधार घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला लगावला. "कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये रवानगी करण्याची वेळ आली आहे", असे एका वाक्यात त्यांना राऊतांवर टीकास्त्र सोडलं.
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत-
"बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला. ४० जणांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही. गुवाहाटीचे हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर. पण महाराष्ट्रात खरा बिग बॉस हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. बंडखोरी हे मी संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या", असं संजय राऊत भरसभेत बोलले.