Shiv Sena vs Eknath Shinde: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत 35-40 आमदार घेऊन गेले असून, राज्यातील सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना उद्देशून भाष्य केले.
'मुख्यमंत्री का भेटत नव्हते..?'"मुख्यमंत्री का भेटत नव्हते, त्याचे कारण म्हणजे माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरचे दोन तीन महिने फार विचित्र होते, त्यामुळेच मी भेटत नव्हतो. मी भेटत नव्हतो, हा मुद्द बरोबर आहे. आता मी भेटायला सुरुवात केली आहे. बर, भेटत नव्हतो म्हणजे काम होतं नव्हते असे नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग रुग्णालयातून केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व जोडलेले शब्द आहेत. शिवसेना आणि हिंदुत्व कधीची वेगळे होऊ शकत नाहीत. सेनेने हाच नारा दिला आहे. विधान भवनात हिंदुत्वावर बोलणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे."
'ते सगळं बाळासाहेबांनंतरच्या शिवेसनेने दिले'मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''अनेकजण म्हणत आहेत की, शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेली आहे. पण, 2012 मध्ये बाळासाहेब गेले, त्यानंतर 2014 मध्ये सेना एकटी लढली. त्यानंतर आताही लढत आहोत. तेव्हाही शिवसेना बाळासाहेबांची होती, आताही आहे. माझ्यासोबत आता जे सहकारी आहेत, ते बाळासाहेबांच्या सोबतचेच आहेत. मधल्या काळात त्यांना जे काही मिळालं, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलं,'' असंही ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकांना आवाहन"ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे, असं वाटत असेल, त्यांनी मला सांगावं. मी पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते," असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.