ठाणे-
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. हिरेन कुटुंबीयांच्या भेटीनंतर सोमय्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राज्याच्या 'उद्धट' ठाकरे सरकारनं मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माफिया पोलिसांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे. हिरेन कुटुंबीयांचा वेदना अजूनही कमी झालेल्या नाहीत. एनआयएचं महत्वाचं प्रतिज्ञापत्र सादर झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आता किंचितसा दिलासा मिळाला आहे. यापुढे कायदेशीर लढा कसा द्यायचा याबाबत माझी हिरेन कुटुंबीयांची ४० मिनिटं चर्चा झाली. उद्धव ठाकरेंना मनसुख हिरेन कुटुंबीयांची माफी मागवीच लागेल", असा पवित्रा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घेतला आहे.
"मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागे उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांचाच हात आहे. मी पुढच्या आठवड्यात एनआयची भेट घेणार आहे. ठाकरे सरकारने हिरेन कुटुंबीयांना अतोनात यातना दिल्या आहेत. ते हळूहळू यातून सावरत आहेत. पण याप्रकरणात उद्धव ठाकरेंना हिरेन कुटुंबीयांची माफी मागावीच लागेल. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयानेच गृह विभागाला वसुलीचं टार्गेट दिलं होतं. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने बेकायदेशीरपणे नियुक्ती झाली होती. निर्दोष लोकांच्या सुपाऱ्या देऊन आज या कुटुंबाला अनाथ आणि निराधार करण्याचं पाप ठाकरे सरकारनं केलं आहे", असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
संजय राऊत विषय भरकटवणारा भोंगाठाकरे सरकारवरील आरोप समोर यायला लागले की संजय राऊत विषय बदलतात. संजय राऊत म्हणजे विषय बदलण्यासाठी लावलेला उद्धव ठाकरेंचा भोंगा आहे, असा खोचक टोला यावेळी किरीट सोमय्या यांनी लगावला. मनसुख हिरेन यांच्या हत्येमागचा हेतू वसुली हाच होता हे सिद्ध झालं आहे. एनआयएनं मनसुख हिरेन यांना विक्टिम ठरवलं आहे. १०० कोटींच्या वसुलीचं काम उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयानेच अनिल देशमुख यांना दिलं होतं. यातूनच मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे", असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.