अहमदनगर - शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा. जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगाव दुहेरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा. जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. शिवसैनिकांचा हात अजून उठलेला नाही, जर तो उठला तर नामर्दांच्या अवलादीला ठेचून काढू."केडगाव दुहेरी हत्याकांडाचे बळी ठरलेल्या शिवसैनिकांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ''या हत्याकांडातील आरोपींना कोणतीही दयामाया दाखवण्यात येऊ नये. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे. आरोपी कोणत्याही पक्षाचे असला तरी त्यांना शासन झालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून तुम्ही राज्यकारभार चालवणार असाल तर गुन्हेगारांना शिक्षा करा, अन्यथा महाराजांचे नाव घेऊ नका,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारण्यात आलेल्या पावित्र्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला, "राज्यात मुख्यमंत्रीच सहकारी मंत्र्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर हे सरकार निकम्मे आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट आहे. त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे." ''या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना इथे आणले पाहिजे. तसेच या प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांना मी स्वत: फोन करणार आहे, त्यांच्याकडे ही केस सोपवली गेली पाहिजे.'' अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. लोकांवर दबाव टाकला जात आहे, असंच जर होत असेल तर आम्हाला इथे येऊन ठाण मांडावे लागेल आणि ही गुंडागर्दी मोडून काढावी लागेल. शिवसेनेला कायदा हातात घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 12:36 PM