मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी या भेटीच्या वृत्ताल दुजोरा दिला असून, दहा दिवसांपूर्वी घेतलेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकारणातील सद्यस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच सत्तेत राहायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी विचारविमर्श केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांच राज्याच्या राजकारणात नवी राजकीय गणिते समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. या भेटीमध्ये ठाकरे यांनी भाजपा सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नसल्याचे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणे यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे अनेक नेते राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास इच्छुक आहेत. राणेंना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रभावातून बाहेर पडून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी कट्टर भाजपा विरोधक असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठींमधून भाजपाला स्पष्ट संकेत देण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.