अहमदनगर - आम्हाला राजकीय विरोध होतोय. हिंदुत्व नकली आहे असा आरोप आमच्यावर करतात. तुम्ही हिंदुत्वासाठी काय करताय? हिंदुत्व दाखवण्याची गोष्ट नसते. हिंदुत्व हा आपला संस्कार, संस्कृती, जगण्यातील भावना आहे. उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं, मशिदीवर दगडे मारायची, मुस्लिमांविरोधात बोलायचे याला हिंदुत्व मानायला बाळासाहेब ठाकरे कधीच तयार नव्हते असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
खा. संजय राऊत म्हणाले की, आमच्या हिंदुत्वाचा आधार सावरकर आहेत. जगभरात प्रत्येकाचा विचार असतो. ज्यांची विचारांचा पाया दिला त्यांचेही पुतळे लोकांनी पाडले होते. जगातील कामगारांनी एक व्हा या क्रांतीला बळ दिले असेल तर लेनिन मार्क्स यांनी. महाराष्ट्राच्या असंख्य चळवळीत डाव्या विचारांचे लोक होते. कॉ. डांगे, जॉर्ड फर्नाडिंस, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्टांचा सहभाग होता असं राऊत यांनी सांगितले.
तसेच पक्ष कोणाचा हे जनता ठरवेल. निवडणूक आयोग नाही. ही शिवसेना लोकांनी निर्माण केली आणि शिवसेनाप्रमुखपद जनतेने दिलेय हे बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे. निवडणूक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली नव्हती. बाळासाहेब ठाकरे महापुरुष आहे हे नक्कीच आहे. आम्ही लोकांमध्ये असतो. लोकं निवडणुकीची वाट बघतायेत. खरोखर यांच्यात हिंमत असेल आणि स्वत:ला मर्द समजत असतील तर निवडणूक घ्या असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिले.
दरम्यान, आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील. मी ठाण्यात उभा राहीन असं ते म्हणालेत. ही लढाई आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. ज्याने बेईमानांचे नेतृत्व केले अशा माणसांविरोधात ठामपणे आमचा नेता लढण्यासाठी उभा आहे. यातून महाराष्ट्राला, शिवसेनेला आणि तरुण पिढीला बळ मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची ताकद वाढली पाहिजेकाँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची ताकद देशात वाढली पाहिजे. १०० पेक्षा जास्त जागा काँग्रेस जिंकत नाही तोवर परिवर्तन शक्य नाही. अनेक राज्यात काँग्रेसला विरोधाची स्पेस द्यायला तयार नाही. काँग्रेस कमकुवत होतेय. भाजपाला कमकुवत करून काँग्रेस टिकायला हवी. राष्ट्रीय स्तरावर काम करणारा कुठला तरी एक पक्ष हवा असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.